Tag Archives: stayhome

सुख म्हणजे नक्की काय असतं….

प्रशांत दामलेंचं हे गाणं फारच सुरेख आणि अर्थपूर्ण आहे. खरंच सुख म्हणजे नक्की काय? प्रत्येकाच्या सुखाच्या कल्पना वेगळ्या असतात. कोणाला छोट्या छोट्या गोष्टीतसुद्धा सुख दडलेलं दिसतं तर कोणाच्या पायाशी सुख अगदी लोळण घेत असतं पण हे त्याच्या गावीही नसतं. खरंतर सुख मानण्यावर असतं. मनाला आनंद देणाऱ्या इवल्याश्या गोष्टी म्हणजे पण सुखंच नाही का? असंच एक इवलंस सुख मला परम आनंद देऊन गेलं.

तर झालं असं covid-१९ मुळे सगळं जग ठप्प झालेलं. शाळा पण online सुरू झाल्या, आणि ह्या online शाळेचे पहिले विद्यार्थी शिक्षकच ठरले. Laptop, wifi, zoom, microsoft teams, google classroom, powerpoint, word ह्या सगळ्या चक्रव्यूहात अडकलेले अभिमन्यू म्हणजे शिक्षक. ह्याचं training त्याचं training, शेवटच्या मिनिटाला बदलणारे plans, सगळ्यांची अगदी धांदल उडालेली. आपल्याला हे सगळं समजतंय का किंवा जमेल का हा विचार करायला सुद्धा वेळ मिळत नव्हता. त्यात भर म्हणून मुलांच्या पण शाळेच्या orientation, parent teacher meetings (हेही online च बरंका) हेही चालूच होतं.

ह्या सगळ्या धामधुमीत घराचं मात्र रणांगण झालेलं (कचराकुंडी हे जरा जास्त सार्थ ठरेल). आणि जेवणाचे हाल तर विचारायलाच नकोत, जेवण बनवायला चुकून वेळ मिळालाच तर वरण भात हे ठरलेलं (खरंतर वेळात वेळ काढवाच लागत होता जेवण बनवण्यासाठी, कारण एकतर restaurants सगळे बंद आणि असंही कोरोनाच्या दहशतीमुळे बाहेरचं मागवायलाही मन धजावत नव्हतं). दाळ तांदूळ तर आपोआपच cooker मध्ये शिजतील पण ते खायलाही पुरेसा वेळ मिळेनासा झाला होता.

आणि हे सगळं कमी म्हणून की काय एके दिवशी आम्हा सगळ्या शिक्षकांना एका trainig साठी शाळेत बोलावलं होतं. online शाळा सुरू होणार होत्या त्यामुळे तीन चार दिवसांपासून झोप नीट होत नव्हती. आदल्या दिवशीच शाळेचा पहिला दिवस व्यवस्थित पार पडला (की पाडला) होता म्हणून खूप गाढ झोप लागली आणि सकाळी उठायला उशीर झाला. आणि मग अवघ्या अर्ध्या तासात आवरून शाळेची बस जिंकली (जिंकलीच – अतिशयोक्ति नाही ही). पण त्या अर्ध्या तासाच्या आवरण्यात जेवण बनवणे हा slot add करताच आला नव्हता. एकंदरीत काय तर दुपारच्या जेवणाचं काय हा विचार डोक्यात तरळत ठेऊनच मी training attend करत होते. Finally training संपलं आणि घरी पोचायला दुपारचे २ वाजले.

आजच्या training चं नवीन ओझं, लॉक डाऊन सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच घराबाहेर पडल्यामुळे, training मध्ये जे सगळे होते त्यांच्यापैकी कोणाला कोरोना झालेला तर नसेल ना ही भीती, आणि पोटात भुकेमुळे आकांडतांडव करणारे कावळे ह्या सगळ्यांसमवेतच मी घरात प्रवेश केला. छान गार पाण्याने आंघोळ करून fresh होते न होते तोच, आता जेवण बनवायचं कधी अन मग जेवायचं कधी ह्या कल्पनेनं अंतःकरण जड झालं आणि नवऱ्याने का नाही बनवलं आजचा दिवस जेवण निदान cooker तरी का नाही लावला ह्या विचारानं मेंदू बेभान झाला. आणि तश्याच म्लान अवस्थेत मी किचन मध्ये प्रवेश केला.

पण मग आली kitchen की कहाणी मे twist. चक्क जेवण तयार होतं. अगदी भाजी भात आणि पोळी सुद्धा. इथे मी फक्त cooker तरी लावला असेल का अशी क्षुल्लक आशा करत बसले होते पण मला छप्पर फाडके मिळालं. नवऱ्याने आणि मुलाने मला surprise द्यायचं असं ठरवून पूर्ण जेवण बनवलं होतं. माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. अगदी काकुळतीला आलेल्या मला न मागता एवढं छान रुचकर जेवण मिळालं आणि तेही आयतं, मन कसं तृप्त होऊन गेलं. पोटच नाहीतर अगदी मन भरेपर्यंत जेवण करून आरामात सोफ्यावर whatsapp चे संदेश चाळत बसले.

अनेक संदेशांमद्धे माझ्या एका विद्यार्थिनीच्या आईचा संदेश होता. आणि त्यात लिहिलं होतं

माझी विद्यार्थिनी खूप खूप खुश झाली कारण यावर्षी पण मीच तिची class teacher होते , आणि खूप दिवसांनी मला पाहून ती चक्क घरभर नाचत होती .

आणि ह्या संदेशयासोबतच तिच्या आईने तिच्या नाचण्याचा video करून पाठवला होता. तो video पाहून माझ्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. आयतं मिळालेलं जेवण आणि मला पाहून खुशीने नाचणारी ती गोंडस मुलगी पाहून आपोआप मी गाऊ लागले मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं काय पुण्य असतं की जे घरबसल्या मिळतं .. .. .. .. .. .. .. ..

शिलेदार क्र. २
माझ्या सुखाची शिलेदार - १
माझ्या आजच्या सुखाची शिलेदार क्र. १
why to wait to listen…… right here right now

एक अविस्मरणीय प्रवास

अनेक योगायोग किंवा कल्पनेपलीकडच्या घटना जर काही तासातच घडल्या तर आपण म्हणतो हे सगळं फक्त चित्रपटातच घडू शकतं. एकाच दिवसात एकापेक्षा अनेक अनपेक्षित घटना घडल्या तर असं वाटतं कि आपण दिवास्वप्न पाहतोय, एवढी प्रस्तावना यासाठीच की माझ्या आयुष्यात असाच काहीसा स्वप्नवत वाटणारा दिवस येउन गेलाय.

मी इंजिनियरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकत होते. २००२ च्या फेब्रुवारी मध्ये एका रोजी मी आणि माझ्या दोन मैत्रिणींनी ‘बासर’ (जिथे देवी सरस्वतीचं अतिशय प्रख्यात मंदिर आहे) या गावी जाण्याचं ठरवलं. कधी जायचं, कसं जायचं सगळं ठरवलं.

सरस्वती मंदिर, बासर

ठरल्याप्रमाणं आम्ही पहाटे ५.३० पर्यंत रेल्वेस्थानकावर पोचलो. तिथे पोचल्यावर कळलं कि काही कारणास्तव बासरला जाणारी रेल्वे रद्द करण्यात आली होती. इथपासून आमच्या नाट्यमय आणि उत्कंठावर्धक दिवसाची सुरुवात झाली. रेल्वे तर रद्द झाली होती आता कसं जायचं? मग शासनाच्या लाल गाडीने जायचं ठरवलं आणि आम्ही तिघी बस स्थानकावर पोचलो. चौकशीअंति असं कळलं की बासरच्या बसला अजून दोन तास अवकाश होता. दोन तास काय करायचं? त्या दिवशी महाशिवरात्री होती म्हणून आम्ही शिव मंदिरात जायचं ठरवलं.

लालपरी

शिवमंदिरातील वातावरण खूपच प्रसन्न होते. ओम नमः शिवाय चा गजर चालू होता, भक्तिभावाने अनेक लोक महादेवाचं दर्शन घेत होते. अशा भक्तिपूर्ण, उत्साही आणि अध्यात्मिक वातावरणात शिवस्तुती करत आम्ही आमचे दोन तास घालवले. महादेवाचा आशीर्वाद घेऊन पुन्हा एकदा ‘बासर’ प्रवास आरंभला. बसस्थानकात पोचलो आणि आमच्या प्रवासात अजून एक वळण आलं. बासरला जाणाऱ्या बस मध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे बस रद्द करण्यात आली होती. दूसरी बस संध्याकाळी होती, म्हणजे आता मात्र बासर प्रवास रद्द करावा लागणार या विचाराने आम्ही तिघीही हिरमुसलो आणि जड पावलाने परत निघलो. इतक्यात काही लोकांनी आम्हाला थांबवलं, ते सगळे पण बासरला जाणार होते. त्यांनी एक प्रस्ताव मांडला तो असा की, सगळ्यांनी मिळुन एक खाजगी वाहन ठरवायचं आणि संध्याकाळ पर्यंत परत यायचं. आम्हाला तो प्रस्ताव आवडला आणि काही क्षणासाठी रखडलेला बासर प्रवास पुन्हा एकदा सुरु झाला. खूप हायसं वाटलं.

गाडी बासरच्या दिशेने भरधाव धावत होती. हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे छान गार वारा लागत होता. सगळेच अनोळखी होते पण तरीही एक प्रकारचे सकारात्मक आणि आल्हाददायक वातावरण गाडीत निर्माण झालं होतं. अनेक गावं मागे टाकत आम्ही पुढे जात होतो, आणि अचानक गाडी नरसी गावाजवळ थांबली. रस्त्यावर खूप गर्दी वाटली, बरेच लोक रस्ता अडवून थांबले होते. उस दरवाढीसाठी शेतकऱ्यांनी रस्तारोको आंदोलन उभारलं होतं. कोणत्याच वाहनास ते पुढे जाऊ देत नव्हते. थोडी भीती वाटली, थोडी काळजीही वाटली काय करावे काही कळत नव्हते. पुढे जाता येत नव्हते, माघारी फिरण्यास मन तयार होत नव्हते. काय करावं या द्विधा मनस्थितीतच आम्ही जवळपास दोन तास तिथेच थांबलो. बऱ्याच विनवण्या करून त्या लोकांनी काही वाहनास पुढे जाण्याची परवानगी दिली, त्यात आमचीही गाडी होती. अनिश्चित काळासाठी थांबलेला आमचा प्रवास परत एकदा सुरु झाला.

परत एकदा आम्हा तिघींना देवी सरस्वतीच्या दर्शनाचे वेध लागले. लवकरच बासरला पोचणार या विचारात आमचे डोळे कधी मिटले कळलंच नाही. काही वेळानंतर आमची गाडी अचानक थांबली, आम्हाला वाटलं की बासर आलं म्हणून आनंदाने जागी होऊन पहिलं तर कळलं की गाडीचा एक चाक पंक्चर झाला होतं आणि अतिरिक्त चाकात हवाच नव्हती. अरे देवा! अजून एक समस्या दत्त म्हणून हजर झाली. पूर्ण दिवसभरात आमच्यासमोर एकच प्रश्न वारंवार उभा राहत होता ‘आता पुढे काय करायचं?’ चाक दुरुस्त करण्यासाठी ग्यारेज जवळपास नव्हतं म्हणून गाडीचा चालक ते चाक घेऊन जवळच्या गावात गेला. आता त्या चालकाची वाट पाहण्याखेरीज आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता.  बराच वेळ गेला तरीही तो चालक परत आला नव्हता, दिवस मावळतीकडे झुकत होता. काय करावं काही सुचत नव्हतं. आमच्यासोबत असलेल्या काही लोकांनी सांगितलं की दुसऱ्या वाहनाने जवळच्या गावी (धर्माबाद)  जा, तिथून बासर जवळ आहे तेंव्हा तिथे बासर साठी खूप गाड्या मिळतील. आम्हाला ते पटलं आणि आम्ही दुसऱ्या वाहनाने  धर्माबादला पोचलो.
 

बसस्थानकात जाऊन बासरच्या गाडीची चौकशी केली असता कळलं की बासरला जाणारी शेवटची गाडी नुकतीच गेली, आणि दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत एकही गाडी नव्हती. आता मात्र उरलं सुरलं अवसानही गळून पडलं, डोकं सुन्न झालं होतं. आमच्यासमोर परत फिरण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता पण मन मानायलाच तयार नव्हतं, इतक्या अडचणीनंतरही एवढ्या जवळ येउन परत फिरायचं या विचारानं गलबलायला होत होतं. कसं बसं आम्ही एकमेकींना सावरलं आणि गाडी व्यतिरिक्त बासरला पोचण्यासाठी काही व्यवस्था होईल का हे शोधू लागलो.

एक खाजगी ऑटो रिक्शा बासरला यायला तयार झाला. बुडत्याला काडीचा आधार तसा आम्हाला त्या रिक्शाचा आधार वाटला. अर्ध्या तासानी आम्ही बासरला पोचलो.  देवी सरस्वतीचं मंदिर समोर दिसत होतं आणि मनात विचार येत होते की शेवटी आम्ही जिंकलो, आमची जिद्द, आशा आणि इच्छा फळाला आली. नव्या जोमाने आणि उत्साहाने देवीच्या दर्शनासाठी आम्ही मंदिराच्या आवारात प्रवेश केला. तिथे प्रचंड गर्दी होती. असंख्य लोक देवीच्या दर्शनासाठी रांगेत उभे होते. महाशिवरात्रीला बासरला खूप मोठी जत्रा असते, यादिवशी देवीचं दर्शन घेणं अत्यंत शुभ मानलं जातं म्हणून एवढी गर्दी होती. त्या रांगेत उभा राहून दर्शनासाठी २-३ तास लागणार होते आणि संध्याकाळचे ७ वाजले होते. आमच्याकडे इतका वेळ नव्हता. म्हणून आम्ही पास च्या रांगेतून जायचा ठरवलं. आणि पुढच्या अवघ्या १० मिनिटात देवीच्या गाभाऱ्यात पोचलो.

समोर देवी सरस्वतीची मूर्ती पाहून सगळा थकवा, मरगळ नाहीशी झाली. आम्ही प्रसन्न मनाने आणि समर्पित वृत्तीने देवी समोर नतमस्तक झालो. इतक्या अडचणीनंतरही आम्ही पोचू शकलो म्हणून देवीचे आभार मानले, परतीचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी साकडं घातलं  आणि देवीचा आशीर्वाद घेऊन माघारी फिरलो.

लवकर धर्माबादला परतण्यासाठी रिक्षावाल्याने कच्चा शेतातून जाणारा रस्ता निवडला होता. रात्रीचे ८-८.३० वाजले होते अंधार पडला होता, रिक्षात आम्ही तिघीच होतो आम्हाला खूप भीती वाटत होती. पण लवकरच आम्ही धर्माबादला पोचलो. बसस्थानकात गेल्यावर कळलं की परतीच्या प्रवासाच्या सगळ्या गाड्या गेल्या होत्या आणि दुसऱ्यादिवशी सकाळपर्यंत एकही गाडी नव्हती. आता मात्र आम्ही आत्यंतिक अगतिक झालो. काय करायचं काही सुचेना तेंव्हा एकाने सांगितलं की जवळच्या एका गावातून आमच्या गावी जाण्याऱ्या गाड्या रात्रभर चालू असतात. पण त्या गावी जाण्यासाठीही एकही वाहन नव्हतं. अगदी थकून आम्ही रस्त्यातच उभ्या होतो. तेवढ्यातच एक ट्रक समोर येउन थांबला. आणि आम्ही ठरवलं आता काहीही होवो या ट्रकनेच पुढच्या गावी जायचं, तसं आम्ही ट्रक चालकाला विचारलं तो आम्हाला न्यायला तयार झाला.

ट्रकमध्ये सगळे पुरुष होते त्यात रात्रीची वेळ त्यामुळे ट्रकने जाण्याचा आमचा निर्णय तसा धाडसीच होता. खूप भीती वाटत होती, एकेक क्षण एकेका वर्षासारखा वाटत होता. आम्ही एकमेकींना अगदी घट्ट पकडून बसलो होतो,  जणू काही न बोलताही स्पर्शातून एकमेकींना दिलासा आणि शक्ती देत होतो. शेवटी आम्ही त्या गावी पोचलो, बसस्थानकावर आमच्या गावी जाणारी बस उभी होती. हुश्श! खूप हायसं वाटलं, अत्यंत खुशीत आणि समाधानात आम्ही गाडीत बसलो. गाडीने तासाभरात आम्हाला आमच्या गावी पोचवले. घरी पोचेपर्यंत रात्रीचे १२ वाजले होते. आणि घरी पोचल्यावर लक्षात आलं की दिवसभरात आम्ही काहीच खाल्लं नाही, एकानंतर एक अश्या काही घडामोडी घडल्या की भुकेची भावना बळावलीच नाही. अत्यंतिक नाट्यमय परीस्थितींनी आणि भावनिक चढ उतारांनी खूप मानसिक थकवा आणि सुखरूप घरी पोचल्याचं समाधान यामुळे खूप गाढ झोप लागली.
                                  सकाळो उठल्यावर असं वाटलं की मी स्वप्न पहात होते पण ते खरच घडलं होतं आमच्यासोबत. देवी सरस्वतीने आमची परीक्षा घेतली आणि आम्ही त्यात विशेष श्रेणीने उत्तीर्ण झालो……………………।

प्रवासातल्या त्या तिघी .. १८ वर्षांनंतर

गहिवर

सूर्याची असंख्य किरणे रोज पडतात या पृथ्वीवर
पण आशेचा तो किरण गवसत नाही
मन भटकत राहतं जगाच्या नकाशावरून
आणि मग स्वर कातर होतो उगाच
आजकाल मन गहिवरून येतं उगाच

गहिवर

कोण कुठले ते लोक, ना ओळखीचे ना पाळखीचे
तरीही जोडल्या गेलो आहोत एका भीतीच्या धाग्याने
संकटाचा सामना करण्यापेक्षा कल्पनेनंच होतो बेजार
आणि मग शून्यात हरवतो उगाच
आजकाल मन गहिवरून येतं उगाच

काय कुठे कसं वागावं कळतच नाही
आणि जीव घरात रमतच नाही
उद्याचा विचार जणू सुचतच नाही
आणि गुरफटून बसतो भूतकाळात उगाच
आजकाल मन गहिवरून येतं उगाच

सगळ्या जगावर राज्य करणारा कोण हा शत्रू
कोण घालणार याला वेसण अन कधी
उजाड ओसाड रस्त्यांवरून जेव्हा फिरते नजर
अंगावर येतो शहारा उगाच
आजकाल मन गहिवरून येतं उगाच

चैतन्य

प्रत्येक काळरात्रीनंतर चैतन्यमयी प्रकाश पसरतो
आपण होऊ त्याचे साक्षीदार मन मला सांगत राहतं
ही एक उमेद देते बळ हत्तीचं करण्या संकटावर या मात सगळीकडे दिसतो मग आनंद आणि उत्साह
अन सुखाश्रूंनी परत मन गहिवरून येतं उगाच

पांगूळगाडा

पांगूळगाडा हे नाव उच्चारताच नुकतंच धडपडत चालायला शिकत असलेलं छोटं मूल डोळ्यासमोर येतं. पण मी जर म्हटलं की वयाच्या तिशीनंतर आज मी एक पांगूळगाडा चालवला आहे किंवा मला एका नवीन वाटेवर चालण्यासाठी एक पांगूळगाडा गवसला आहे तर, हो पांगुळगाडाच. तर ह्या माझ्या पांगुळगाड्याचं नाव आहे प्रचिती तलाठी.

तर झालं असं बरेच दिवसापासून एक नवीन वाट मला खुणावत होती. मलाही खूप इच्छा होती त्या वाटेवर चालण्याची पण सुरुवात कुठून आणि कशी करावी ते उमगत नव्हतं. आणि ती वाट म्हणजे ब्लॉग writing. मी इतरांनी लिहिलेले बरेच ब्लॉग्स वाचले होते, ब्लॉग्स लिहायला हवेत असंही ऐकलं होतं पण हे अनोळखी जग आत्मसात कसं करायचं हे मात्र जरा न सुटणारं कोडं होऊन बसलं होतं.

आणि चार एक दिवसांपूर्वी ग्रंथ वाचक कट्टा यू. ए. ई. या whatsapp समूहावरती प्रचितीचा संदेश वाचला ब्लॉगलेखन कसे करावे? ही online कार्यशाळा आणि मग काय लगेच या कार्यशाळेसाठी नाव नोंदवलं.

आणि आज म्हणजेच २९ मे २०२० या रोजी ही कार्यशाळा पर पडली. एकूण आम्ही ८ ते ९ जण या कार्यशाळेत सहभागी झालो होतो. सुरुवात आमच्या सगळ्यांच्या परिचयाने झाली आणि मग प्रचितीने खूप छान पद्धतीने आमच्या सगळ्यांचे बोट धरून आम्हाला या ब्लॉग writing मधील wordpress या माध्यमाची अनोखी सफर घडवली. ब्लॉग्स writing बद्दलच्या सगळ्या अडचणी दूर झाल्या. कार्यशाळेची सांगता करताना प्रचिती म्हणाली जवळपास प्रत्येकालाच आयुष्यात काही नवीन गोष्टी करण्यासाठी किंवा शिकण्यासाठी एक पांगूळगाडा लागतो आणि हे मनोमन पटलं.

अश्याप्रकारे प्रचितीच्या रूपाने मला ब्लॉग्स writing च्या वाटेवर चालायला शिकवणारा पांगूळगाडा गवसला. आणि आजचा माझा हा पहिलं ब्लॉग मी प्रचितीला dedicate करते.