Tag Archives: #कविता

महाराष्ट्र माझा

अनोखे इथले लोक
अनोखी येथली माती,
आगळीच शान महाराष्ट्राची
आहे या भू वरती.

इतिहास अमर केला
छत्रपती शिवरायांनी,
साकारण्या स्वप्न स्वराज्याचे
सह्याद्रीसम कणखर मावळे आले सरसावूनी

स्वराज्य हा जन्मसिद्ध हक्क
गरजले टिळक वाघावानी,
अपार ध्येयासक्ती सावरकरांची
पार केला महाकाय सागर पोहूनी

क्रिकेट चे दैवत सचिन तेंडुलकर
वसते जिथे हीच ती भूमी,
जनक हरितक्रांतीचे वसंतराव नाईक
यांचीही आहे हीच जन्मभूमी

भारतीय सिनेमाची मुहूर्तमेढ रोवली
इथल्याच दादासाहेब फाळके यांनी,
जादुई आवाजाने जगभरास मोहून टाकलं
इथल्याच गाण कोकिळा लता दीदींनी

स्त्री शिक्षणाची चळवळ लढवून
स्त्रीयांना स्वतंत्र केलं सावित्रीबाईंनी,
राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब
निपजले याच पवित्र भूमीतूनी

नावापरी महान हे राज्य
इथेच आहे देशाची आर्थिक राजधानी,
मोडेन पण झुकणार नाही
सळसळते ही भावना प्रत्येकाच्या मनातुनी

अश्या या महाराष्ट्राची लेक मी
बाळगते सार्थ अभिमान उरी,
लेऊनी संस्कार मराठी
मिरवते जगभरी मिरवते जगभरी