Category Archives: My experiences

कौतुक

चार दिवसांपूर्वी मित्रांच्या whatsapp ग्रुप वर एका कवितेचा विडिओ पहिला. कविता मैत्रीवर होती. फारच अप्रतिम कविता होती. त्या कवितेतील शब्द न शब्द अंगावर रोमांच उभा करणारा होता. मित्र रसात डुंबवून सुखी करून सोडलं त्या कवितेने.

जेव्हा पण असे अप्रतिम लेख किंवा कविता वाचते तेव्हा नेहमी वाटतं की त्या अप्रतिम रचनांच्या जनकाला आपल्या आवडीची आणि आनंदाची पोच पावती द्यावी. ज्या प्रमाणे त्या कलाकृतीने माझ्या मनास उमेद दिली त्याचप्रमाणे मीही त्याचं कौतुक करून त्यालाही प्रोत्साहित करावं. पण कधी नेमकं काय कौतुक करावं हे न कळून, कधी त्याला असं अनामिकाने ओळख पाळख नसताना केलेलं कौतुक आवडेल की नाही याची भीड बाळगून तर कधी कुठे, कसा आणि कोणाला संपर्क करावा या अनुत्तरित प्रश्नामुळे राहून जात. पण यावेळी संपर्क करून कविता आवडली हे कळवायचंच असं ठरवलं. त्या विडिओ मध्ये कविचं नाव आणि भ्रमणध्वनी क्रमांक असे दोन्ही तपशील होते मग काय केला संपर्क कवीशी आणि कविता खूप आवडली हे सांगितलं.

माझा संदेश वाचून त्या कवीला खूप आनंद झाला त्यांनी माझे धन्यवाद मानले आणि एक संदेश पाठवला

“Thank you ताई छान वाटलं तुम्ही आवर्जून msg केलात .”

त्यांचा हा संदेश वाचून मलाही खूप आनंद झाला. आणि वाटलं की तसं पहायला गेलं तर फार काही वेगळं काम मी नव्हतं केलं, माझ्या आधी कित्येक लोकांनी त्या कवीला दाद दिली असेल कौतुक केलं असेल पण तरीही माझी प्रतिक्रिया ऐकून त्यांना खरंच आनंद झाला होता. आणि त्याहीपेक्षा जास्त काहीतरी मला मिळालं होतं. एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा. माझ्या शब्दांमुळे, कौतुकामुळे कोणाला तरी खुशी मिळाली ही भावना मला सुखावून गेली.

मनात एका नवीन जाणिवेचा अंकुर उगवला की कोणाचं तरी कौतुक करताना वा एखाद्याला काहीतरी चांगलं सांगताना आधी आपल्यामध्ये तो सकरात्मकतेचा भाव निर्माण होतो आणि मग तोच भाव पुढच्यापर्यंत पोचतो. म्हणजे ते म्हणतात ना ‘जो बोवोगे वही पाओगे’ यात थोडा बदल करून ‘जो दोगे वही पाओगे’ तसं. जर कौतुक करून आपल्यालाही त्याचा फायदा होणार असेल तर काय हरकत आहे नं आवडलेल्या गोष्टींचं कौतुक करायला.

त्यामुळे कौतुक करत चला आणि सकारात्मक ऊर्जा मिळवत चला.

जाणीव

“कुठल्याही गोष्टीची जाणीव होणे हीच बदलाची सुरुवात असते “

जाणीव, वर लिहिलेले वाक्य हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवातून लिहलं आहे. मला नेहमीच असं वाटायचं आणि अनेक अनुभवांमधून हे सिद्ध ही झालं की माणसाला जाणीव झाल्याशिवाय माणूस बदलत नाही. आणि त्यातही स्वजाणीव म्हणजे स्वताला जाणवायला हवं दुसऱ्यांनी कितीही सांगून उपयोग नसतो. आणि एकदा का जाणीव झाली की माणूस बदललाच म्हणून समजा.

जाणिवा जाग्या होताच वाल्याचा झाला वाल्मिकी, असाच एक प्रसंग, अनुभव मी इथे मांडत आहे.

माझा मुलगा सात्विक इयत्ता तिसरीमध्ये शिकत आहे. यू. ए. ई. मध्ये असल्या कारणाने अरेबिक हा भाषा विषय शिकणे अपरिहार्य आहे. इयत्ता पहिली आणि दुसरी मध्ये फक्त मूळाक्षरांचा अभ्यास करायचा होता तोपर्यंत फार काही अवघड वाटलं नाही (उलट जे लोक अरेबिक विषयासाठी शिकवणी लावतात ते किती वेडे आहेत अशी हीन भावना अनेकदा मनात डोकावून गेली).

एप्रिल २०२० मध्ये सात्विक ने इयत्ता तिसरीमध्ये प्रवेश केला. आणि कोविड महाशयांच्या कृपेमुळे (कोपामुळे) शाळा घरूनच सुरू झाली. प्रत्येक विषयांसाठी वेगळे शिक्षक असून सुद्धा एक शिक्षिका मात्र सगळ्याच विषयांशी दोन हात करत लढत होती. आणि ती म्हणजे ‘आई’ (ही जवळपास सगळ्याच घरात होती) म्हणजे अर्थातच मी. आणि मग जेव्हा माझ्यावर (ज्याच्याशी फारच सख्य जुळलं आहे असं वाटत होतं त्या) अरेबिक विषयाशी दोन हात करायची वेळ आली तेव्हा मात्र खरी लढाई सुरू झाली.

इयत्ता तिसरीत अरेबिक चा अभ्यासक्रम वाढला होता, मुळाक्षरांचे दिवस संपले होते आणि आता शब्द, शब्दांपासून वाक्य, प्रश्न उत्तरे, व्याकरण असे क्लिष्ट विषय सुरू झाले. आणि कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर प्रमाणे माझी गत झाली. रोग काय आहे कळला होता पण त्यावर उपचार कसा करावा हे मात्र कळत नव्हतं. काय करावं हे कळायच्या आतच घटक चाचणीची वेळ जवळ आली. विचार आला, की शिकवणी लावावी का? हा विचार मनात येताच ज्यांच्याबद्दल हीन भावना बाळगली होती ते लोक आपसात माझ्या अति शहाणपणा विषयी खुसपुस करत माझ्यावर फिदी फिदी हसत आहेत असा भास व्हायचा.

पण कोविड मुळे लॉक डाऊन असल्या कारणाने खाजगी शिकवण्या पण बंद झाल्या होत्या आणि अश्याच धामधुमीत घटक चाचणी संपन्न झाली. अरेबिक च्या परीक्षेत काही म्हणजे काही कळलं नाही आणि याचा परिणाम जो व्हायचा तोच झाला. अरेबिक मध्ये अत्यंत कमी गुण मिळाले. मला आणि सात्विकच्या बाबांना फार वाईट आणि हतबल वाटलं. सात्विक मात्र काहीच झालं नाहीये या अविर्भावात फिरत होता. त्याला आधीच अभ्यासात रुचि नाही आणि त्यात अरेबिक विषयाबद्दल तर विचारायलाच नको.

पण अरेबिक साठी काहीतरी केलं पाहिजे असं वाटलं तसं एक पाऊल पुढे टाकलं. माझी मैत्रीण माधुरी हिला थोडं अरेबिक येतं म्हणून रोज एक तास सात्विकला तिच्याकडे पाठवलं. हळू हळू सात्विकला अरेबिक मध्ये आवड निर्माण झाली. माधुरीने खूप छान पद्धतीने सात्विकचा पाया तयार करवून घेतला. सात्विक आता खडाखड अरेबिक मूळाक्षरं वाचू आणि लिहू लागला. अमात्रिक शब्द पण वाचू लागला. पण सात्विक चा अरेबिक विषयातील कंटाळा मात्र अजूनही पुरता गेला नव्हता. आणि परीक्षा संपून बरेच दिवस झाल्यामुळे आमची अरेबिक विषय शिकण्याची उर्मी आणि तीव्रता ही कमी झाली आणि ही शिकवणी मध्येच थांबली.

उन्हाळी सुट्ट्या संपल्या आणि प्रथम सत्र परीक्षा जवळ आली. आणि अरेबिक विषय शिकण्याची गरज वाढली अर्थातच माझी सात्विक ची नव्हे. मग मात्र असं हातावर हात धरून, हरून चालणार नाही काहीतरी केलंच पाहिजे, कसंही करून हे जमलंच पाहिजे ही जाणीव प्रखरतेनं झाली. आणि इथेच बदल घडायला सुरुवात झाली.

सात्विकच्या बाईंनी पाठवलेल्या सगळ्या नोट्स एकत्र केल्या, सगळे शब्द, प्रश्न उत्तर लिहून काढले(अरेबिक मध्ये). गूगल मामा, माधुरी मावशी, आणि यूट्यूब काकांच्या मदतीने सगळ्या शब्दांचे उच्चार मराठीत लिहिले. प्रत्येक शब्दाचा अर्थ मराठीत लिहून काढला. सात्विक सोबत मी पण सगळे शब्द, उच्चार, अर्थ वारंवार लिहून काढले, वाचले. सात्विकला खूप कंटाळा यायचा माझा खूप रागही यायचा, त्याला वाटायचं की मी त्याला कित्ती त्रास देते. न आवडीचा विषय सारखा लिहायला वाचायला सांगते. पण त्याला परीक्षेच्या एक दिवस आधीपर्यंत परीक्षेच्या अभ्यासक्रमातील सगळं व्यवस्थित यायला लागलं होतं.

परीक्षेचा दिवस उजाडला, परीक्षा सुरू झाली. त्याला प्रश्न वाचण्यासाठी काही मदत लागेल म्हणून मी त्याच्यासोबत बसले होते. त्यालाही खूप धडधड होत होतं की आपल्याला काही येईल की नाही, अभ्यास केलेलं आठवेल की नाही ह्या विचारातच त्याने प्रश्नपत्रिका उघडली. जसं मी पहिला प्रश्न वाचण्यासाठी आ वासला तसा सात्विक म्हणाला नको सांगूस आई मला कळलं आहे काय करायचं ते. आणि खटखट त्याने सगळे प्रश्न क्षणभराची उसंत न घेता सोडवले. त्याला सगळे प्रश्न कळले आणि उत्तरेही आली. त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. परीक्षा जशी संपली तसा तो अक्षरशा नाचायला लागला. त्याने लगेच माधुरीला फोन केला, अभ्यासात त्याची मदत केल्याबद्दल धन्यवाद देण्यासाठी. आणि मला म्हणाला “आई मला खूप भारी वाटतंय, मला सगळं आलं आजच्या परीक्षेत. आता मला कळलं की तू एवढा माझा अभ्यास घेतलास म्हणूनच हे होऊ शकलं म्हणून मी आता रोज अभ्यास करणार म्हणजे मला नेहमीच परीक्षा सोपी होईल. “

आणि त्याला झालेली ही स्वजाणीव पाहून माझं मन भरून आलं. आणि परत मला पटलं की जाणीव होणे हीच बदलाची सुरुवात असते.

एक अविस्मरणीय प्रवास

अनेक योगायोग किंवा कल्पनेपलीकडच्या घटना जर काही तासातच घडल्या तर आपण म्हणतो हे सगळं फक्त चित्रपटातच घडू शकतं. एकाच दिवसात एकापेक्षा अनेक अनपेक्षित घटना घडल्या तर असं वाटतं कि आपण दिवास्वप्न पाहतोय, एवढी प्रस्तावना यासाठीच की माझ्या आयुष्यात असाच काहीसा स्वप्नवत वाटणारा दिवस येउन गेलाय.

मी इंजिनियरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकत होते. २००२ च्या फेब्रुवारी मध्ये एका रोजी मी आणि माझ्या दोन मैत्रिणींनी ‘बासर’ (जिथे देवी सरस्वतीचं अतिशय प्रख्यात मंदिर आहे) या गावी जाण्याचं ठरवलं. कधी जायचं, कसं जायचं सगळं ठरवलं.

सरस्वती मंदिर, बासर

ठरल्याप्रमाणं आम्ही पहाटे ५.३० पर्यंत रेल्वेस्थानकावर पोचलो. तिथे पोचल्यावर कळलं कि काही कारणास्तव बासरला जाणारी रेल्वे रद्द करण्यात आली होती. इथपासून आमच्या नाट्यमय आणि उत्कंठावर्धक दिवसाची सुरुवात झाली. रेल्वे तर रद्द झाली होती आता कसं जायचं? मग शासनाच्या लाल गाडीने जायचं ठरवलं आणि आम्ही तिघी बस स्थानकावर पोचलो. चौकशीअंति असं कळलं की बासरच्या बसला अजून दोन तास अवकाश होता. दोन तास काय करायचं? त्या दिवशी महाशिवरात्री होती म्हणून आम्ही शिव मंदिरात जायचं ठरवलं.

लालपरी

शिवमंदिरातील वातावरण खूपच प्रसन्न होते. ओम नमः शिवाय चा गजर चालू होता, भक्तिभावाने अनेक लोक महादेवाचं दर्शन घेत होते. अशा भक्तिपूर्ण, उत्साही आणि अध्यात्मिक वातावरणात शिवस्तुती करत आम्ही आमचे दोन तास घालवले. महादेवाचा आशीर्वाद घेऊन पुन्हा एकदा ‘बासर’ प्रवास आरंभला. बसस्थानकात पोचलो आणि आमच्या प्रवासात अजून एक वळण आलं. बासरला जाणाऱ्या बस मध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे बस रद्द करण्यात आली होती. दूसरी बस संध्याकाळी होती, म्हणजे आता मात्र बासर प्रवास रद्द करावा लागणार या विचाराने आम्ही तिघीही हिरमुसलो आणि जड पावलाने परत निघलो. इतक्यात काही लोकांनी आम्हाला थांबवलं, ते सगळे पण बासरला जाणार होते. त्यांनी एक प्रस्ताव मांडला तो असा की, सगळ्यांनी मिळुन एक खाजगी वाहन ठरवायचं आणि संध्याकाळ पर्यंत परत यायचं. आम्हाला तो प्रस्ताव आवडला आणि काही क्षणासाठी रखडलेला बासर प्रवास पुन्हा एकदा सुरु झाला. खूप हायसं वाटलं.

गाडी बासरच्या दिशेने भरधाव धावत होती. हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे छान गार वारा लागत होता. सगळेच अनोळखी होते पण तरीही एक प्रकारचे सकारात्मक आणि आल्हाददायक वातावरण गाडीत निर्माण झालं होतं. अनेक गावं मागे टाकत आम्ही पुढे जात होतो, आणि अचानक गाडी नरसी गावाजवळ थांबली. रस्त्यावर खूप गर्दी वाटली, बरेच लोक रस्ता अडवून थांबले होते. उस दरवाढीसाठी शेतकऱ्यांनी रस्तारोको आंदोलन उभारलं होतं. कोणत्याच वाहनास ते पुढे जाऊ देत नव्हते. थोडी भीती वाटली, थोडी काळजीही वाटली काय करावे काही कळत नव्हते. पुढे जाता येत नव्हते, माघारी फिरण्यास मन तयार होत नव्हते. काय करावं या द्विधा मनस्थितीतच आम्ही जवळपास दोन तास तिथेच थांबलो. बऱ्याच विनवण्या करून त्या लोकांनी काही वाहनास पुढे जाण्याची परवानगी दिली, त्यात आमचीही गाडी होती. अनिश्चित काळासाठी थांबलेला आमचा प्रवास परत एकदा सुरु झाला.

परत एकदा आम्हा तिघींना देवी सरस्वतीच्या दर्शनाचे वेध लागले. लवकरच बासरला पोचणार या विचारात आमचे डोळे कधी मिटले कळलंच नाही. काही वेळानंतर आमची गाडी अचानक थांबली, आम्हाला वाटलं की बासर आलं म्हणून आनंदाने जागी होऊन पहिलं तर कळलं की गाडीचा एक चाक पंक्चर झाला होतं आणि अतिरिक्त चाकात हवाच नव्हती. अरे देवा! अजून एक समस्या दत्त म्हणून हजर झाली. पूर्ण दिवसभरात आमच्यासमोर एकच प्रश्न वारंवार उभा राहत होता ‘आता पुढे काय करायचं?’ चाक दुरुस्त करण्यासाठी ग्यारेज जवळपास नव्हतं म्हणून गाडीचा चालक ते चाक घेऊन जवळच्या गावात गेला. आता त्या चालकाची वाट पाहण्याखेरीज आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता.  बराच वेळ गेला तरीही तो चालक परत आला नव्हता, दिवस मावळतीकडे झुकत होता. काय करावं काही सुचत नव्हतं. आमच्यासोबत असलेल्या काही लोकांनी सांगितलं की दुसऱ्या वाहनाने जवळच्या गावी (धर्माबाद)  जा, तिथून बासर जवळ आहे तेंव्हा तिथे बासर साठी खूप गाड्या मिळतील. आम्हाला ते पटलं आणि आम्ही दुसऱ्या वाहनाने  धर्माबादला पोचलो.
 

बसस्थानकात जाऊन बासरच्या गाडीची चौकशी केली असता कळलं की बासरला जाणारी शेवटची गाडी नुकतीच गेली, आणि दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत एकही गाडी नव्हती. आता मात्र उरलं सुरलं अवसानही गळून पडलं, डोकं सुन्न झालं होतं. आमच्यासमोर परत फिरण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता पण मन मानायलाच तयार नव्हतं, इतक्या अडचणीनंतरही एवढ्या जवळ येउन परत फिरायचं या विचारानं गलबलायला होत होतं. कसं बसं आम्ही एकमेकींना सावरलं आणि गाडी व्यतिरिक्त बासरला पोचण्यासाठी काही व्यवस्था होईल का हे शोधू लागलो.

एक खाजगी ऑटो रिक्शा बासरला यायला तयार झाला. बुडत्याला काडीचा आधार तसा आम्हाला त्या रिक्शाचा आधार वाटला. अर्ध्या तासानी आम्ही बासरला पोचलो.  देवी सरस्वतीचं मंदिर समोर दिसत होतं आणि मनात विचार येत होते की शेवटी आम्ही जिंकलो, आमची जिद्द, आशा आणि इच्छा फळाला आली. नव्या जोमाने आणि उत्साहाने देवीच्या दर्शनासाठी आम्ही मंदिराच्या आवारात प्रवेश केला. तिथे प्रचंड गर्दी होती. असंख्य लोक देवीच्या दर्शनासाठी रांगेत उभे होते. महाशिवरात्रीला बासरला खूप मोठी जत्रा असते, यादिवशी देवीचं दर्शन घेणं अत्यंत शुभ मानलं जातं म्हणून एवढी गर्दी होती. त्या रांगेत उभा राहून दर्शनासाठी २-३ तास लागणार होते आणि संध्याकाळचे ७ वाजले होते. आमच्याकडे इतका वेळ नव्हता. म्हणून आम्ही पास च्या रांगेतून जायचा ठरवलं. आणि पुढच्या अवघ्या १० मिनिटात देवीच्या गाभाऱ्यात पोचलो.

समोर देवी सरस्वतीची मूर्ती पाहून सगळा थकवा, मरगळ नाहीशी झाली. आम्ही प्रसन्न मनाने आणि समर्पित वृत्तीने देवी समोर नतमस्तक झालो. इतक्या अडचणीनंतरही आम्ही पोचू शकलो म्हणून देवीचे आभार मानले, परतीचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी साकडं घातलं  आणि देवीचा आशीर्वाद घेऊन माघारी फिरलो.

लवकर धर्माबादला परतण्यासाठी रिक्षावाल्याने कच्चा शेतातून जाणारा रस्ता निवडला होता. रात्रीचे ८-८.३० वाजले होते अंधार पडला होता, रिक्षात आम्ही तिघीच होतो आम्हाला खूप भीती वाटत होती. पण लवकरच आम्ही धर्माबादला पोचलो. बसस्थानकात गेल्यावर कळलं की परतीच्या प्रवासाच्या सगळ्या गाड्या गेल्या होत्या आणि दुसऱ्यादिवशी सकाळपर्यंत एकही गाडी नव्हती. आता मात्र आम्ही आत्यंतिक अगतिक झालो. काय करायचं काही सुचेना तेंव्हा एकाने सांगितलं की जवळच्या एका गावातून आमच्या गावी जाण्याऱ्या गाड्या रात्रभर चालू असतात. पण त्या गावी जाण्यासाठीही एकही वाहन नव्हतं. अगदी थकून आम्ही रस्त्यातच उभ्या होतो. तेवढ्यातच एक ट्रक समोर येउन थांबला. आणि आम्ही ठरवलं आता काहीही होवो या ट्रकनेच पुढच्या गावी जायचं, तसं आम्ही ट्रक चालकाला विचारलं तो आम्हाला न्यायला तयार झाला.

ट्रकमध्ये सगळे पुरुष होते त्यात रात्रीची वेळ त्यामुळे ट्रकने जाण्याचा आमचा निर्णय तसा धाडसीच होता. खूप भीती वाटत होती, एकेक क्षण एकेका वर्षासारखा वाटत होता. आम्ही एकमेकींना अगदी घट्ट पकडून बसलो होतो,  जणू काही न बोलताही स्पर्शातून एकमेकींना दिलासा आणि शक्ती देत होतो. शेवटी आम्ही त्या गावी पोचलो, बसस्थानकावर आमच्या गावी जाणारी बस उभी होती. हुश्श! खूप हायसं वाटलं, अत्यंत खुशीत आणि समाधानात आम्ही गाडीत बसलो. गाडीने तासाभरात आम्हाला आमच्या गावी पोचवले. घरी पोचेपर्यंत रात्रीचे १२ वाजले होते. आणि घरी पोचल्यावर लक्षात आलं की दिवसभरात आम्ही काहीच खाल्लं नाही, एकानंतर एक अश्या काही घडामोडी घडल्या की भुकेची भावना बळावलीच नाही. अत्यंतिक नाट्यमय परीस्थितींनी आणि भावनिक चढ उतारांनी खूप मानसिक थकवा आणि सुखरूप घरी पोचल्याचं समाधान यामुळे खूप गाढ झोप लागली.
                                  सकाळो उठल्यावर असं वाटलं की मी स्वप्न पहात होते पण ते खरच घडलं होतं आमच्यासोबत. देवी सरस्वतीने आमची परीक्षा घेतली आणि आम्ही त्यात विशेष श्रेणीने उत्तीर्ण झालो……………………।

प्रवासातल्या त्या तिघी .. १८ वर्षांनंतर