चार दिवसांपूर्वी मित्रांच्या whatsapp ग्रुप वर एका कवितेचा विडिओ पहिला. कविता मैत्रीवर होती. फारच अप्रतिम कविता होती. त्या कवितेतील शब्द न शब्द अंगावर रोमांच उभा करणारा होता. मित्र रसात डुंबवून सुखी करून सोडलं त्या कवितेने.
जेव्हा पण असे अप्रतिम लेख किंवा कविता वाचते तेव्हा नेहमी वाटतं की त्या अप्रतिम रचनांच्या जनकाला आपल्या आवडीची आणि आनंदाची पोच पावती द्यावी. ज्या प्रमाणे त्या कलाकृतीने माझ्या मनास उमेद दिली त्याचप्रमाणे मीही त्याचं कौतुक करून त्यालाही प्रोत्साहित करावं. पण कधी नेमकं काय कौतुक करावं हे न कळून, कधी त्याला असं अनामिकाने ओळख पाळख नसताना केलेलं कौतुक आवडेल की नाही याची भीड बाळगून तर कधी कुठे, कसा आणि कोणाला संपर्क करावा या अनुत्तरित प्रश्नामुळे राहून जात. पण यावेळी संपर्क करून कविता आवडली हे कळवायचंच असं ठरवलं. त्या विडिओ मध्ये कविचं नाव आणि भ्रमणध्वनी क्रमांक असे दोन्ही तपशील होते मग काय केला संपर्क कवीशी आणि कविता खूप आवडली हे सांगितलं.
माझा संदेश वाचून त्या कवीला खूप आनंद झाला त्यांनी माझे धन्यवाद मानले आणि एक संदेश पाठवला
“Thank you ताई छान वाटलं तुम्ही आवर्जून msg केलात .”
त्यांचा हा संदेश वाचून मलाही खूप आनंद झाला. आणि वाटलं की तसं पहायला गेलं तर फार काही वेगळं काम मी नव्हतं केलं, माझ्या आधी कित्येक लोकांनी त्या कवीला दाद दिली असेल कौतुक केलं असेल पण तरीही माझी प्रतिक्रिया ऐकून त्यांना खरंच आनंद झाला होता. आणि त्याहीपेक्षा जास्त काहीतरी मला मिळालं होतं. एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा. माझ्या शब्दांमुळे, कौतुकामुळे कोणाला तरी खुशी मिळाली ही भावना मला सुखावून गेली.
मनात एका नवीन जाणिवेचा अंकुर उगवला की कोणाचं तरी कौतुक करताना वा एखाद्याला काहीतरी चांगलं सांगताना आधी आपल्यामध्ये तो सकरात्मकतेचा भाव निर्माण होतो आणि मग तोच भाव पुढच्यापर्यंत पोचतो. म्हणजे ते म्हणतात ना ‘जो बोवोगे वही पाओगे’ यात थोडा बदल करून ‘जो दोगे वही पाओगे’ तसं. जर कौतुक करून आपल्यालाही त्याचा फायदा होणार असेल तर काय हरकत आहे नं आवडलेल्या गोष्टींचं कौतुक करायला.
त्यामुळे कौतुक करत चला आणि सकारात्मक ऊर्जा मिळवत चला.
नात्यांच्या गुलदस्त्या मधील एक झक्कास आणि हवं हवंस नातं म्हणजे मावशी. मावशी म्हणजे सख्खी मैत्रीण असते. आईची बहीण म्हणजे प्रति आईच. तर आई आणि मावशी या नात्यावर माझी ही छोटीशी कविता.
मला दोन मावश्या आहेत त्यातल्या एकीचा आज जन्मदिवस आहे म्हणून आजच्या दिवशी ही कविता मी माझ्या दोन्ही मावश्यांना अर्पित करते.
आई आणि मावशी आयुष्यातले दोन महत्वाचे सूत्र, आई असते सर्वस्व तर मावशी सख्खा मित्र
आई मायेचा अथांग सागर तर मावशी झऱ्याचं खळाळतं पाणी आई म्हणजे उबदार गोधडी तर मावशी म्हणजे भरजरी पैठणी
आई म्हणजे कडक शिस्त तर मावशी म्हणजे हवी असलेली पळवाट आई सोबत लपवा लपविचा खेळ सगळा तर मावशी मनापर्यंत पोचणारी गुप्तवाट
आई असते wifi network तर मावशी त्याचा password आई whatsapp university तर मावशी त्यातले forward
ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार म्हणजे “मैत्री दिवस”. मैत्री हे नातं फारच वेगळं असतं, ह्या नात्याबद्दल काही मांडायचा छोटासा प्रयत्न.
आपण वेढलेले असतो असंख्य नात्यांनी पण जवळचं आणि हक्काचं असतं ते नातं मैत्रीचच, मैत्री हे रक्ताचं नातं नसतं पण रक्ताच्या नात्यापेक्षाही जास्त ओढ असते ती मैत्रीतच, मैत्रीत कसलीच बंधनं नसतात पण न बांधताही अतूट असतं ते नातं मैत्रीचच, मैत्रीत अपेक्षांचं ओझं नसतं पण अपेक्षा न करताही सारं काही मिळतं ते मैत्रीतच, मैत्रीत काही सांगायचा नसतं पण न सांगताही सारं काही कळत ते मैत्रीतच, मैत्रीत चुका काढल्या जात नाहीत पण चुका न काढता सुधारल्या जातात त्या मैत्रीतच, मैत्रीत क्षमा मागायची नसते पण क्षमा न मागताही सारं काही माफ होतं ते मैत्रीतच , मैत्री हे नातं जपावं लागत नाही पण न जपताही जे चिरंतन असतं ते नातं मैत्रीचच.
आम्ही दोघे भावंडं. मी मोठी आणि माझ्यापेक्षा ७ वर्षांनी लहान माझा भाऊ मंगेश. व्यवसायाने तो radiologist आहे. त्याचं शिक्षण पूर्ण होते ना होते तोच (तसं medicle field मधील मुला/मुलींचं शिक्षण आयुष्यभर चालूच असतं पण आम्हा पामरांच्या मते जे माफक शिक्षण होतं ते संपलं होतं) ‘आमच्या मुलाचं यंदा कर्तव्य आहे’ असं सांगून आई पप्पा भरून पावले. आणि मग वधु संशोधनाला सुरुवात झाली.
मागच्या वर्षी मार्च/एप्रिल च्या काळात एका अत्यंत हुशार, सालस आणि अर्थातच डॉक्टर मुलीशी माझ्या भावाच्या रेशीमगाठी जुळल्या. आणि मग ११ जुलै २०१९ रोजी या दोहोंचा विवाह सोहळा अत्यंत थाटात मराठवाड्यातील नांदेड या गावी पार पडला.
तर माझ्या वहिनीचं नाव बबिता, ती सध्या वर्धा येथे medicine मध्ये M.D. करत आहे.
लग्नानंतर काहीच दिवसात तिला तिच्या M.D. च्या कार्यात रुजू व्हावे लागले आणि मला माझ्या कर्मभूमीत परत यावे लागले. मला तिचा फार सहवास लाभला नाही पण थोड्याश्या सहवासातच एवढं कळलं की बबिता खूप हुशार, गुणी, अत्यंत साधी आणि निरागस मुलगी आहे.
Covid – १९ च्या या महामारीत सुरुवातीला भारतात आणि specially महाराष्ट्रात जेव्हा cases खूप प्रमाणात वाढत होत्या तेव्हा मला तिची जास्त काळजी वाटत होती कारण ती सरकारी दवाखान्यातच M.D. करत आहे. आणि त्यातही तिची field पण medicine परिणामी तिला covid-१९ च्या विभागातच कार्यरत राहावं लागत होतं. पहिल्या दोन lockdown नंतर ही काळजी थोडी कमी झाली कारण वर्धा (जिथे बबिता M.D. करत आहे) अद्यापही हिरव्या zone मधेच होता. वर्ध्यात एकही covid रोगी अजून आढळला नव्हता. ही एक मोठी जमेची बाजू.
तिसरं lockdown सुरू झालं आणि मुंबईतल्या cases दिवसागणिक खूप मोठ्या प्रमाणावर वाढत होत्या. त्यामुळे मुंबईत इस्पितळासोबतच doctors पण अपुरे पडू लागले. परिणामी महाराष्ट्र सरकारने खाजगी इस्पितळ आणि खाजगी डॉक्टर्स ना सरकारी सेवेत रुजू होण्याची विनंती केली. तसेच green zone मधील सरकारी डॉक्टर्स ना मुंबईत covid इस्पितळात रुजू होण्याचे आदेश जारी केले. आणि या आदेशांतर्गत बबिता ला पण मुंबईला जाण्याचे आदेश मिळाले.
आम्ही सगळे घाबरलो, कुठे वर्धा green zone मध्ये आहे म्हणून खुश होत होतो आणि आता तर direct hot spot असलेल्या मुंबईत ती जाणार. तिच्या आत्यंतिक काळजी पोटी आम्ही तिला मुंबईला न जाण्याविषयी सुचवू लागलो, जाणे टाळण्यासाठी काही वेगळे पर्याय आहेत का हे शोधू लागलो. त्यावेळी मनात कुठेतरी वाटत होतं की ती म्हण आज आम्हा सगळ्यांना लागू होतेय, ‘शिवाजी जन्मावा पण शेजा ऱ्याच्या घरी’. आम्ही असंच काहीसं वागत होतो. पण बबिताचा निर्धार पक्का होता,आमच्या कुठल्याच प्रलोभनांना न भुलता, तिची सदसदविवेकबुद्धी जागी ठेऊन आणि तिच्याअंतरात्म्याला जागं ठेऊन ती सध्याच्या कोरोनायुक्त मायानगरी मुंबईत दाखल झाली. ती एकटीच नाही तर जवळपास ५० doctors ची टीम covid रुग्णांच्या सेवेत रुजू झाले.
तब्बल २० दिवस हे सगळे कोरोना वीर आणि वीरांगना covid विरुद्ध seven hills या इस्पितळात लढत होते. तहान भूक सगळं विसरून महान सेवेत कार्यरत होते. आणि विशेष म्हणजे त्यांना ह्या त्यांच्या कामात आनंद मिळत होता, कसलीच तक्रार नाही. जणू काही PPE kit च्या आत त्यांना त्यांच्या जीवनाचा मूलमंत्रच मिळाला. रुग्णसेवेचे महान कार्य करून २० दिवसांनंतर सगळे सुखरूप परत वर्ध्याला पोचले.
मला बबिताचा खूप अभिमान वाटला. ह्या तिच्या कार्यामुळे मला तिची नव्याने ओळख झाली, एक संवेदनशील, आपल्या कामाच्या प्रती इमानदार, स्वतःची जबाबदारी जाणून ती पूर्ण करणारी बाबिता. आज १२ जून तिचा जन्मदिवस आहे ह्यापेक्षा दूसरा चांगला दिवस मला मिळणार नाही तिच्याबद्दलच्या माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी म्हणून हा ब्लॉग लिहिण्याचा प्रपंच.
बबिता तुला जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, अशीच नेहमी तू तुझ्या कर्तव्यात परायण राहाविस अशी ईश्वर चरणी प्रार्थना.
सूर्याची असंख्य किरणे रोज पडतात या पृथ्वीवर पण आशेचा तो किरण गवसत नाही मन भटकत राहतं जगाच्या नकाशावरून आणि मग स्वर कातर होतो उगाच आजकाल मन गहिवरून येतं उगाच
गहिवर
कोण कुठले ते लोक, ना ओळखीचे ना पाळखीचे तरीही जोडल्या गेलो आहोत एका भीतीच्या धाग्याने संकटाचा सामना करण्यापेक्षा कल्पनेनंच होतो बेजार आणि मग शून्यात हरवतो उगाच आजकाल मन गहिवरून येतं उगाच
काय कुठे कसं वागावं कळतच नाही आणि जीव घरात रमतच नाही उद्याचा विचार जणू सुचतच नाही आणि गुरफटून बसतो भूतकाळात उगाच आजकाल मन गहिवरून येतं उगाच
सगळ्या जगावर राज्य करणारा कोण हा शत्रू कोण घालणार याला वेसण अन कधी उजाड ओसाड रस्त्यांवरून जेव्हा फिरते नजर अंगावर येतो शहारा उगाच आजकाल मन गहिवरून येतं उगाच
चैतन्य
प्रत्येक काळरात्रीनंतर चैतन्यमयी प्रकाश पसरतो आपण होऊ त्याचे साक्षीदार मन मला सांगत राहतं ही एक उमेद देते बळ हत्तीचं करण्या संकटावर या मात सगळीकडे दिसतो मग आनंद आणि उत्साह अन सुखाश्रूंनी परत मन गहिवरून येतं उगाच
पांगूळगाडा हे नाव उच्चारताच नुकतंच धडपडत चालायला शिकत असलेलं छोटं मूल डोळ्यासमोर येतं. पण मी जर म्हटलं की वयाच्या तिशीनंतर आज मी एक पांगूळगाडा चालवला आहे किंवा मला एका नवीन वाटेवर चालण्यासाठी एक पांगूळगाडा गवसला आहे तर, हो पांगुळगाडाच. तर ह्या माझ्या पांगुळगाड्याचं नाव आहे प्रचिती तलाठी.
तर झालं असं बरेच दिवसापासून एक नवीन वाट मला खुणावत होती. मलाही खूप इच्छा होती त्या वाटेवर चालण्याची पण सुरुवात कुठून आणि कशी करावी ते उमगत नव्हतं. आणि ती वाट म्हणजे ब्लॉग writing. मी इतरांनी लिहिलेले बरेच ब्लॉग्स वाचले होते, ब्लॉग्स लिहायला हवेत असंही ऐकलं होतं पण हे अनोळखी जग आत्मसात कसं करायचं हे मात्र जरा न सुटणारं कोडं होऊन बसलं होतं.
आणि चार एक दिवसांपूर्वी ग्रंथ वाचक कट्टा यू. ए. ई. या whatsapp समूहावरती प्रचितीचा संदेश वाचला ब्लॉगलेखन कसे करावे? ही online कार्यशाळा आणि मग काय लगेच या कार्यशाळेसाठी नाव नोंदवलं.
आणि आज म्हणजेच २९ मे २०२० या रोजी ही कार्यशाळा पर पडली. एकूण आम्ही ८ ते ९ जण या कार्यशाळेत सहभागी झालो होतो. सुरुवात आमच्या सगळ्यांच्या परिचयाने झाली आणि मग प्रचितीने खूप छान पद्धतीने आमच्या सगळ्यांचे बोट धरून आम्हाला या ब्लॉग writing मधील wordpress या माध्यमाची अनोखी सफर घडवली. ब्लॉग्स writing बद्दलच्या सगळ्या अडचणी दूर झाल्या. कार्यशाळेची सांगता करताना प्रचिती म्हणाली जवळपास प्रत्येकालाच आयुष्यात काही नवीन गोष्टी करण्यासाठी किंवा शिकण्यासाठी एक पांगूळगाडा लागतो आणि हे मनोमन पटलं.
अश्याप्रकारे प्रचितीच्या रूपाने मला ब्लॉग्स writing च्या वाटेवर चालायला शिकवणारा पांगूळगाडा गवसला. आणि आजचा माझा हा पहिलं ब्लॉग मी प्रचितीला dedicate करते.